रत्नागिरी -कोकणाच्या लाल मातीतही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होऊ शकते, हे देवरूखमधील शैलेश भस्मे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. फक्त शेतीवरच न थांबता भस्मे हे स्ट्रॉबेरीपासून इतर उत्पादनेही बनवतात. या उत्पादनांना चांगली मागणी आहे आणि यातून भस्मे यांना चांगली आर्थिक उलाढाल होत आहे.
हेही वाचा -राम मंदिरासाठी नरेंद्रचार्य महाराज संस्थानकडून 2 कोटी 53 लाख
शैलेश भस्मे यांचा स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग
कोकणात शेतीमध्ये अलीकडच्या काळात नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत, पारंपरिक भातशेतीबरोबरच इतरही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील शैलेश भस्मे हे असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग राबविला. स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या नजरेसमोर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण येते. या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होऊ शकते, हे शैलेश भस्मे यांनी दाखवून दिले.
सुरुवातीला केले माती परीक्षण
स्ट्रॉबेरीची शेती करण्याचे ठरवल्यानंतर भस्मे यांनी सुरुवातीला माती परीक्षण केले. त्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी आवश्यक असणारे घटक मातीमध्ये असल्याचे समाजल्यानंतर त्यांनी दीड एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. साधारणतः एक एकर जमिनीमध्ये जवळपास 20 हजार स्ट्रॉबेरीची झाडे लावण्यात आली. प्रत्येक झाडाला 700 ते 800 ग्राम स्ट्रॉबेरी उत्पन्न पकडले तरी 14 ते 15 टन उत्पन्न यातून मिळू शकते, असे शैलेश भस्मे सांगतात. सध्या ही स्ट्रॉबेरी 700 ते 400 रुपये किलो दराने विकली जात आहे.