रत्नागिरी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. गेले काही दिवस काही ठिकाणी या लॉकडाऊनमध्ये शिथिलताही देण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला. कोकणातील गणेशमूर्ती व्यावसायिकांनाही याचा फटका बसला आहे. सध्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये सर्व नियम, अटी पाळून काम सुरू आहे. मात्र, सुरुवातीला मातीचा तुटवडा आणि सध्या कामगारांचाही तुटवडा गणेश व्यावसायिकांना जाणवत आहे. त्यातच यावर्षी गणेशमूर्तींच्या उंचीवर शासनाने निर्बंध आणले आहेत. मात्र, आर्थिक चणचण आणि चाकरमान्यांची सणासाठी येण्याची अनिश्चितता यामुळे यावर्षी छोट्या मूर्तींना मागणी असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.
कोकण आणि गणेशोत्सव यांचे एक वेगळे नाते आहे. कोकणात गौरी-गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एक प्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असे की, घराघरातून पुजल्या जाणाऱ्या गौरी-गणपतींचा थाट अगदी सार्वजनिक उत्सवांसारखाच असतो. त्यामुळेच कामानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात असणारा कोकणी माणूस या सणासाठी आपल्या कोकणातील गावी हमखास येतो. यावर्षी मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळेच मूर्तीशाळांमधली लगबग कमी असल्याचे पहायला मिळत आहे.
कोरोनामुळे छोट्या गणेशमूर्तींना मागणी; रत्नागिरीतील व्यावसायिकांना आर्थिक फटका हेही वाचा...ऐकावं ते नवलच; महिलांनी 'यासाठी' नळाची पूजा करुन बांधली लिंबू -मिरची
काही मूर्तीशाळांमध्ये वर्षभर गणेशमूर्ती तयार काम सुरू असते. तर काही मूर्तिकार 5 ते 6 महिने अगोदर मूर्तीकामांना सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्तिकारांना बसला आहे.
कच्चा माल उशिराने मिळू लागला, त्यामुळे मूर्तीकामाला उशिरा सुरुवात झाली. त्यात गाड्यांची व्यवस्था नसल्याने परठिकाणचे कामगार उपलब्ध होत नसल्याने कामगारांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे यावर्षी कामही कमी केल्याचे मूर्तिकार सुशील कोतवडेकर सांगतात.
सध्या कोतवडेकर यांच्या मूर्तीशाळेत सर्व नियम व अटी पाळून मूर्तीकाम सुरू आहे. मास्क लावूनच मूर्तीशाळेत यावे आणि आल्यावर हाताला सॅनिटाईझर लावावे, अशा सूचना इथे लावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाल्याने तसेच आरोग्याच्या दृष्टीकोणातून गणेशमूर्तीच्या उंचीवर निर्बंध आले आहेत. मात्र, असे असले तरी यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भाविकांकडूनच छोट्या मूर्तींनाच मागणी असल्याचे चित्र दिसत आहे
कोरोनामुळे गावाकडे आलेल्या मंडळींपुढेच पैशाची समस्या उद्भवली आहे. तसेच काही मुंबईत मंडळी अडकली आहेत. त्यांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनची भिती असल्याने अनेकांनी गणपतीसाठी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे. पैशाची तर चणचण आहेच, त्यामुळे कित्येकांनी गावाकडच्या नातेवाईकांना यावर्षी कमी उंचीचा गणपती आणून उत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळेच दरवर्षी 5 ते 6 फूट उंचीची मूर्ती आणणाऱ्यांनी यावर्षी 2 ते 3 फूट उंचीच्या मूर्तीची मागणी नोंदवली आहे. त्यामुळे एकूणच कोरोनाचा फटका जसा गणेशमूर्तीकारांना बसला आहे, तसाच गणेशोत्सव साजरा करण्यावरही या कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे.