रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. रोज जवळपास ४ ते ५ सभा, गाठीभेटी, बैठका आल्याच. नेते, उमेदवारांचा हा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनाही हुरूप येतो. त्यामुळे सध्या सगळीकडे सभा, रॅली आणि प्रचाराचे वातावरण आहे. मात्र, या सभांच्या गोंधळात कोण काय बोलून जाईल ते काही सांगता येत नाही. असंच काहीसं गंमतीदार घडलं ते रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या खेडमधील एका जाहीर सभेत.
गीतेंनाच मत द्या ! तटकरेंच्या खेडमधील सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब मुखातून एकदा जो शाब्दिक बाण गेला तो गेलाच. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.
या सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी जवळपास साडेपाच मिनिटे भाषण केलं. मात्र भाषणाच्या शेवटी चुकून त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी, चक्क सेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगून टाकलं.. '२३ तारीख लक्षात ठेवा, २३ तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गीते साहेबांनाच मतदान करायचं आहे' असे ते बोलून गेले.
मात्र त्यानंतर आपली चूक लक्षात येताच लगेच त्यांनी गीते साहेब नव्हे तटकरे साहेबांना मतदान करा असं सांगून टाकलं. मात्र त्यांच्या मुखातून एकदा जो शाब्दिक बाण गेला तो गेलाच. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.