रत्नागिरी -जिल्ह्यात दोन दिवस गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यात या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कारण पावसाच्या काही दिवस अगोदर केलेली फवारणी पुर्णतः वाया गेली असून आता शेतकऱ्यांना पुन्हा किमान दोन वेळा नव्याने फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना वाढीव भुर्दंड बसणार आहे. आधीच उत्पादन कमी आणि त्यात ही अस्मानी संकटं आल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात-
रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस ठिकठिकाणी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात सापडलं आहे. हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर आहे. त्यात यंदा आंबा उत्पादनही कमी आहे. यात गेले दोन अवकाळी पावसासह गारपीटने जिल्ह्याला झोडपून काढलं. याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.
रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता-
या अवकाळी पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. आंब्यावर बुरशीप्रमाणेच किडीचाही धोका वाढला आहे. या किडीमध्ये मोहोरातीलच फळे कुरतडून टाकण्याची शक्यता आहे. तसेच काही आंब्यांंवर गारांचा जोरदार पाऊस होऊन फटका बसला आहे. त्यामुळे फळ खराब होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे फळांवर काळे डाग पडण्याचा धोका आहे. गारांचा फटका बसलेली फळे काळी पडून पिकताना अडचण निर्माण होईल.
अवकाळी पावसामुळे आंबा पीक धोक्यात- फवारणीचा खर्च वाढला-
या अवकाळी पावसामुळे यापूर्वी केलेली फवारणी पुर्णतः वाया गेली असून, आता तातडीने काळे डाग व बुरशीपासून फळाचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी आवश्यक आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हा आणखी भुर्दंड बसणार आहे. एक एकर जागेवरील झाडांसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा फवारणी खर्चाचा वाढीव फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं आंबा उत्पादक शेतकरी तुकाराम घवाळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.गेल्यावर्षी शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका बसला. त्यात यावर्षी आधीच आंबा उत्पादन कमी असून आंबा हंगामही लांबणीवर पडला आहे. त्यामुळे झालेला खर्चही भरून निघणे कठीण आहे. त्यात या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने पिकांचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणितंच कोलमडलं असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
हेही वाचा-सलग १२ दिवशी दरवाढ; मुंबईत पेट्रोल ९७ रुपये लिटर!