रत्नागिरी- कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य महाविद्यालयाची पदवी घेतलेले सर्वच विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत. याला कारण आहे त्यांची पदवी अवैध ठरणार आहे. त्यामुळे १९९८ सालापासून ज्यांनी इथून पदवी घेतली आहे त्यांच्यासमोर आता नेमके करायचे काय? असा प्रश्न 'आ'वासून उभा आहे. १९९८ मध्ये राज्य सरकारने एक कायदा आणला, त्यात माफसू ( महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ) नागपूर यांनाच मत्स्य शास्त्रासंदर्भातील पदवी देण्याचा अधिकार देण्यात आला.
मात्र, महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे २००६ पर्यंत कुठलेही मत्स्य महाविद्यालय नव्हते. नंतर नागपूर आणि उदगिर इथे मत्स्य महाविद्याल काढण्यात आले. मात्र, १९९८ च्या अध्यादेशाचा आधार घेवून नागपुरातील ५ जणांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. यात कोकण कृषी विद्यापिठा अंतर्गत येणाऱ्या शिरगावातील मत्स्य महाविद्यालयातील डीग्रीला आव्हान दिले गेले.
मत्स्यविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला २०१८ मध्ये ही याचिका दाखल केली गेली आणि नागपूर खंडपीठाने २४ एप्रिलला याचा निकाल देताना सरकारने या महाविद्यालयातून दिलेल्या पदव्यासंदर्भात अध्यादेश काढून कायदा करावा अथवा या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या पदव्या अवैध ठरवाव्यात, अशा सूचना राज्य सरकाला दिल्या. त्यामुळे आपली शैक्षणिक मेहनत फुकट जाणार की काय या विचाराने अनेक विद्यार्थी धास्तावले आहेत.
१९९८ सालापासून शिरगाव मत्स्य महाविद्यालयातून जवळपास १५०० विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडलेत. अशात आता आपण घेतलेले शिक्षण वाया जाईल या भितीने सध्या ही मुले अनेक मार्ग चाचपडतायेत. त्यामुळे रत्नागिरी जवळच्या शिरगावमधील मत्स्य महाविद्यालयातील मुलांशी आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी चर्चा केली. उदय सामंत यांनी फोनवरून या मुलांचा संवाद शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी करून दिला. शिक्षण मंत्र्यांनी येणाऱ्या जूनच्या अधिवेशनात आचारसंहिता संपल्यावर सरकार या संदर्भात वेगळा कायदा करेल, अध्यादेश आणेल आणि कोकण कृषी विद्यापिठातील मत्स्य महाविद्यालयातील मुलांना दिलासा दिला जाईल असे सांगितले.