रत्नागिरी- तिवरे धरण दुर्घटनेनंतर धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोकणातील काही धरणाची स्थिती फारच धोकादायक बनली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण धोकादायक झाले असून या धरणालाही गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण केव्हाही फुटू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दापोलीतील हर्णे-खेम धरणालाही गळती; नागरिकांमध्ये दहशत
तिवरे धरण फुटल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हर्णे-खेम धरणाला गळती लागल्याने नागरिक भीती व्यक्त करत आहेत.
हर्णे खेम धरण 1972 साली कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. या धरणाच्या भिंतीला ठीकठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या तीन गावांना याचा धोका निर्माण झाला.
या गावातील ग्रामस्थांना भीतीच्या सावटाखाली जीवन जगावे लागत आहे. 50 एमएलडी पाणीसाठा असणाऱ्या या धरणाच्या पाण्यापासून 5 गावाची पिण्याच्या पाण्याची गरज भागते. मात्र हेच धरण फुटले तर आपले काय होईल, ही भीती ग्रामस्थांच्या मनात कायम आहे. खेम धरणाच्या गळतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी देखील गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे दुरावस्था झालेल्या या धरणाच्या भिंतीकडे शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.