महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सनातनशी संबंध नाही; काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचे स्पष्टीकरण - loksabha election

काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नव्या वादामुळे अडचणीत सापडले आहेत. नविनचंद्र बांदिवडेकरांचा सनातनशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.

नविनचंद्र बांदिवडेकरांचा कार्यक्रमातील फोटो

By

Published : Mar 22, 2019, 8:41 AM IST

Updated : Mar 22, 2019, 9:15 AM IST

सिंधुदुर्ग- काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नव्या वादामुळे अडचणीत सापडले आहेत. नविनचंद्र बांदिवडेकरांचा सनातनशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावर देखील टीका होत आहे. मात्र, बांदिवडेकर यांनी आपला सनातनशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने देखील बांदिवडेकरांची पाठराखण केलेली आहे.


काही दिवसांपूर्वी काँग्रेसची लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. बांदिवडेकर हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बांदिवडेकरांचा सनातनशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच ते सनातनचे कोकण विश्वस्त असल्याचा दावा देखील केला गेला आहे. सोबतच या दाव्याला दुजोरा देणारे एक छायाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात बांदिवडेकर सनातनच्या सभेदरम्यान उपस्थित असल्याचे छायाचित्रातून स्पष्ट होत आहे.


दरम्यान, आपल्या लोकसभा उमेदवारावर सनातनशी संबंध असल्याचे आरोप झाल्यानंतर लगेचच काँग्रेस त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरली होती. काँग्रेसने आरोपांचे खंडन करत बांदिवडेकर यांची पाठराखण केली. तर दुरीकडे खुद्द बांदिवडेकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. त्यांनी आपला सनातनशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बांदिवडेकर नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. यावर उत्तर देताना फक्त समाज बांधव म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले आहे. तसेच पुराव्यानिशी आरोप सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान देखील बांदिवडेकर यांनी त्यांच्यावरील आरोपानंतर केले आहे.


बांदिवडेकर यांनी सनातन संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. सनातनच्या विचारांशी त्यांना सहानुभूती नाही. वैभव राऊत प्रकरणात पोलीस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत, असा भंडारी समाजाचा समज झाला होता, समाजाच्या दबावामुळे ते फक्त या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथे गेले होते.त्यांनी या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु याप्रकरणी सत्य समोर आल्यामुळे हा विषय आता संपला आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.


बांदिवडेकर सनातन संस्थेची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत. हा विरोध पुढेही कायम राहील. बांदिवडेकर विजयाच्या समीप असल्याने जाणिवपूर्वक विरधकांकडून अपप्रचार करण्यात येत आहे, असेही सावंत म्हणाले.


Last Updated : Mar 22, 2019, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details