रत्नागिरी -कोरोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मूलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्याच्या मार्फत भरघोस निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, बंदरविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतुकीस पर्याय देणाऱ्या फेरीबोटीच्या जेटीचे कामाचे भूमिपूजन राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते म्हाप्रळ येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध -अब्दुल सत्तार - रत्नागिरी अब्दुल सत्तार बातमी
कोकणच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, बंदरविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पूल नादुरुस्त झाल्याने सध्या अवजड वाहतूक बंद आहे. पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरिकांची पुलाअभावी मोठी अडचण होणार ही बाब लक्षात घेतल्याने पुलाचे काम सुरू असतानाच तत्कालीन उपाययोजना म्हणून म्हाप्रळ आंबेत फेरीबोट सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने पाहणी करून बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी बोटीची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले होते. ग्रामस्थांची ही मागणी मान्य करत अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बोटीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार योगेश कदम, पंचायत समिती सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तसेच शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.