रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात किनारी भागात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भागाची केंद्रीय पथकाकडून शनिवारी पाहणी करण्यात आली. नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांसह मिरकरवाडा बंदरात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत समितीने भरीव मदत देण्याचे आश्वासन शेतकर्यांसह मच्छीमारांना दिले आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती शनिवारी रत्नागिरीत दाखल झाली. यामध्ये पथकाचे प्रमुख आयएएस अधिकारी अशोककुमार परमार, केंद्रीय अर्थ विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय वीज बोर्डाचे अधिक्षक अभियंता जे. के. राठोड, केंद्रीय कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, मत्स्य विभागाचे संशोधक अशोक कदम यामध्ये सहभागी झालेले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक -
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथकाने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी वादळापूर्वी प्रशासनाकडून घेतलेली काळजी आणि त्यानंतर मदतीसाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थिती, भविष्यात राबविले जात असलेल्या प्रकल्पांचे प्रेझेंटेशन सादर केले. त्यात भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प, शेल्टर प्रकल्प यांचा समावेश होता. दिलेल्या माहितीवर पथकातील अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.