रत्नागिरी -राजापूर तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. तर स्थानिक जनतेने आणि जागा मालकांनीही या प्रकल्पाला पाठींबा देत आपल्या जमिनींची संमतीपत्रेही दिलेली आहेत. त्यामुळे संबधीत कंपनीकडून आता प्राथमिक स्वरूपात या प्रकल्पस्थळी माती सर्वेक्षणासह कामे हाती घेण्यात आली असून ती सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र तरीही काही नतद्रष्ट मंडळी प्रकल्प विरोधाच्या नावाने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकल्प विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी केले आहे.
प्रकल्प विरोधासाठी पुढाऱ्यांची स्टंटबाजी -प्रकल्प विरोधासाठी एनजीओंच्या पुढाऱ्यांची स्टंटबाजी सुरू असून स्थानिकांच्या सहमतीने सर्वेक्षणाचे काम सुरळीतपणे सुरू असल्याचे पंढरीनाथ आंबेरकर यांनी सांगितले आहे. तसेच काहींनी मोजणी थांबवायचा प्रयत्न केला, आशा बातम्या येत असतानाच केंद्र सरकारने पाठवलेल्या पथकाकडून मोजणीचे काम पूर्ण केले, हे देखील समोर येणे आवश्यक असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोजणी पूर्ण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.