महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुतण्याचे चार नगरसेवक काकाच्या गटात सामील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी डॉ. क्षीरसागर यांच्या गटात म्हणजेच शिवसेनेत शुक्रवारी प्रवेश केला आहे. बीडच्या राजकारणात पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष समोर आला आहे.

By

Published : Jan 29, 2021, 8:33 PM IST

beed
beed

बीड -राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना काका डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी डॉ. क्षीरसागर यांच्या गटात म्हणजेच शिवसेनेत शुक्रवारी प्रवेश केला आहे. बीडच्या राजकारणात पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष समोर आला आहे.

पुतण्याचे वर्चस्व कमी होते का?

बीड नगरपालिकेतील काकू-नाना विकास आघाडीच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. त्यामुळे पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेतील वर्चस्व कमी होते का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

जनतेच्या मनातील आमदार कोण?

पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 29 ग्रामपंचायतीपैकी 21 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या मनातील आमदार कोण? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. यातच बीड शहरातील काकू-नाना विकास आघाडीमधील प्रमुख दावेदार म्हणून असलेले नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैयासाहेब मोरे, रणजीत बनसोडे या चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

७-८ महिन्यात निवडणुका

पुढील सात ते आठ महिन्यांमध्ये बीड नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक शिवसेनेत म्हणजेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या गटाकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का समजला जातो. या सगळ्या परिस्थितीनंतर पुतणे संदीप क्षीरसागर काकाने केलेला राजकीय वार कसा परतवून लावतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details