रत्नागिरी - वाढत्या तापमानाचा फटका कोकणातील आंब्यालाही बसू लागला आहे. झाडावरून काढलेल्या काही आंब्यावर काळे डाग दिसू लागले आहेत. तसेच आंब्यामध्ये साका होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
वाढलेल्या तापमानाचा आंब्याला फटका, साका होण्याची शक्यता - heat
वाढलेल्या तापमानाचा फटका कोकणातील हापूसलाही बसला आहे. उन्हामुळे कैरी गळ वाढलेली आहे.
गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ होत आहे. राज्याच्या काही विभागांमध्ये तर तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहेचले आहे. कोकणातही कधी नव्हे ते तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका कोकणातील हापूसलाही बसला आहे. उन्हामुळे कैरी गळ वाढलेली आहे, जो आंबा तयार झाला आहे, त्या आंब्यावरही बाहेरून काळे डाग दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आंब्यामध्ये साका होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावर्षी थंडी लांबली, त्यामुळे आंब्याला मोहोर उशिरा आला. जो आंबा एप्रिलच्या सुरुवातीला येणे अपेक्षित होता तो आंबा आता तयार होऊ लागला आहे. अशातच उष्णतेचा पारा वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम आंब्यावर होत आहे. आंबा गळ वाढल्यामुळे आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची भीती रत्नागिरीतील ज्येष्ठ आंबा उद्योजक टी. एस. घवाळी यांनी वर्तविली.