रत्नागिरी- आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील निवळी आणि बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी, आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी शासनाच्या नियमानुसार पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी द्या आणि नंतर जिंदाल कंपनीला पुरवठा करा, असे सांगत अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. जर ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तर उद्रेक होईल, त्यानंतर जे काही घडेल त्याला जबाबदार अधिकारी असतील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अखेर जिंदाल कंपनीचे पाणी बंद करुन प्रथम ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
रत्नागिरी तालुक्यातील बावनदी आणि निवळी गावात पाणीटंचाई जाणवत आहे. या परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या 4 विहिरींनी तळ गाठला आहे. या परिसरात धरण आहे. मात्र, एमआयडीसीकडून नियम धाब्याबर बसवत ग्रामस्थांना तहानलेले ठेऊन जिंदाल कंपनीला पाणी पुरवले जाते असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेक वेळा पाण्यासाठी सुतारवाडी, बाईतवाडी यासह बावनदी गावातील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, यावर प्रशासनाने यावर काहीच तोडगा काढला नाही. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.