रत्नागिरी :शिवसेना उद्धवठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांची वहिनी वैद्यकीय कारणामुळे चौकशीला गैरहजर होती. त्यामुळे साळवी यांचे भाऊ आणि पुतण्याला चौकशीला सामोरे जावं लागू शकतं. त्यावेळी त्यांच्यासोबत खुद्द राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले की, "भविष्यात मला कितीही त्रास झाला किंवा अटक झाली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही."
- एसीबीनं राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपपत्रात साळवी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाचाही उल्लेख केला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती असल्याचं एसीबीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
एसीबीच्या चौकशीमुळे राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या : राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबीच्या तपासामुळे अडचणी वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत विभागाने राजन साळवी यांच्या कुटुंबीयांना नोटीस बजावून चौकशीत सहभागी होण्यास सांगितलं होतं. तसंच एसीबीने काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी केली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार राजन साळवी यांचा रत्नागिरी शहरातील बंगला आणि त्यांच्या हॉटेलचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन करण्यात आलं.