रत्नागिरी- जिल्ह्यातील अठरा पगडजाती आणि बारा बलुतेदारांच्या वतीने 'आरमार विजय दिन' साजरा करण्यात आला. आरमार दिनानिमित्त भगवती मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा गौरवशाली इतिहासाला खूप महत्व आहे. महाराजांच्या काळात स्वराज्य निर्मितीबरोबर स्वराज्य सांभाळण्यात आरमाराला विशेष महत्व आहे. मायनाक भंडारी व इतर दर्यासारंगांच्या मदतीने वसूबारसच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे सन १६५७ साली भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले. त्यामुळे परकीय सत्तांना किनाऱ्याकडून शिरकाव करता आला नाही. यामुळे याचे विशेष महत्व आहे. हा गौरवशाली इतिहास आरमार विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
रत्नागिरीत आरमार विजयी दिन साजरा छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता आणि मावळ्यांची वेशभूषा धारण करून 'जय भवानी, जय शिवाजी' च्या गजरात रत्नदुर्ग किल्ल्यावर शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आरमार विजय दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाला शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ऐतिहासिक देखाव्यांचा समावेश होता. ३५ ज्ञातीबांधव राष्ट्रज्योत घेऊन यात सहभागी झाले होते. सायंकाळी ४ वाजता भागेश्वर मंदिर ते रत्नदुर्ग किल्ला अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेचा भगवती मंदिरात समारोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरखोल कान्होजी आंग्रे यांचे ९वे वंशज राघुजीराजे आंग्रे, आरमार विजय दिन समितीचे अध्यक्ष राजीव कीर, सुधाकर मोंडकर, रवी सुर्वे, संतोष पावरी, नाहिदा शेख , रशिदा आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.