रायगड- खालापूर तालुक्यातील बीड गावातील घर जळीत प्रकरणातील बेपत्ता महिला रंजना पाटील आणि त्यांचा मुलगा सुनिल या दोघांचा मृतदेह बीड गावातीलच विहिरीत मिळाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अगोदर फक्त रंजना यांचाच मृतदेह विहिरीत मिळाला होता. मात्र त्यानंतर मुलगा सुनीलचाही मृतदेह विहिरीत मिळून आल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
घर जळीत प्रकरणाला वेगळे वळण; विहिरीत आढळला बेपत्ता आई-मुलाचा मृतदेह
बेपत्ता महिला रंजना पाटील आणि त्यांचा मुलगा सुनिल यांचा मृतदेह बीड गावातच विहिरीत आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
खालापूर तालुक्यातील बीड गावातील भानुदास पाटील यांच्या घराला ४ जुलैला रात्री आग लागली होती. या आगीत भानुदास पाटील यांची मुलगी स्नेहा पाटीलने घराला आग लागल्याचे समजताच पहिल्या मजल्यावरुन उडी मारली होती. तर रंजना पाटील व सुनिल हे बेपत्ता झाले होते. घराला आग लागून घर पूर्ण बेचिराख झाले आहे. त्यामुळे आई व मुलगा या आगीत जळून खाक झाले असे वाटत होते. मात्र पोलिसांनी पूर्ण घराची राख शोधली, तरी त्यात कोणताही मृतदेह सापडला नाही.
आज सकाळी बीड गावातील विहिरीमधून महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता, एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. याबाबत महिलांनी गावात सांगितल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह रंजना पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या घर जळीत प्रकरणाचे गूढ वाढले आहे. त्यानंतर मुलगा सुनील पाटीलचाही मृतदेह विहिरीत मिळून आला. त्यामुळे पोलिसांना आता या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची दिशा बदलली आहे.