रायगड - दररोजप्रमाणे मंगळवारी पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 3 वर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धावपळ करत या महिलेची प्रसूती प्लॅटफॉर्मवरच केली. त्यानंतर बाळ व मातेला वन रुपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनीषा काळे (18) असे या महिलेचे नाव असून ही घटना सकाळी ५च्या सुमारास घडली.
नेरुळपासून पनवेलला निघालेल्या एका महिला पनवेल रेल्वे स्थानकावर आली असता तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. संबंधित बाब लक्षात येताच आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ ही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली. माहिती मिळताच रेल्वे परिसरात असलेल्या वनरुपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिच्यावर उपचार केले. त्यानंतर येथेच प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली. आडोसा तयार करत प्लॅटफॉर्मवर असलेल्या बाकड्यावरच डॉक्टरांनी ही प्रसूती केली. महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिला वनरुपी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. महिला आणि नवजात बालक सुखरूप असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा - ...आता पनवेलमध्ये वकील विरुद्ध प्रांताधिकारी असा संघर्ष