रायगड- मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ५९.४९ टक्के मतदान झाले असून २०१४ च्या तुलनेत एका टक्क्याने मतदान कमी झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यात ही लढत झाली असून वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील हे सुद्धा स्पर्धेत असल्याने बारणे पुन्हा मावळचा गड राखणार की पार्थ पवार दिल्ली गाठणार हे २३ मेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
२०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात चुरस वाढली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीने राजाराम पाटील यांना तिकीट दिल्याने ही निवडणूक तिरंगी ठरली आहे.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे हे दीड लाखांनी विजयी झाले होते. त्यावेळी शेकापतर्फे लक्ष्मण जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२६ मते पडली होती. शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते पडली होती तर १ लाख ११ हजार १८६ मते नोटाला पडली होती.