पनवेल- दुष्काळाच्या झळा संपून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र, तरीही पनवेलकरांना सिडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे पनवेलकरांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, दुसरीकडे नवीन पनवेलकरांचा घसा कोरडा आहे. या ठिकाणी पाणीटंचाई होत असल्यामुळे भाजप नगरसेवकांनी सिडको कार्यालयातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
या ठिकाणी नवीन पनवेल नोडला 9 हजार ग्राहक आहेत. येथे 42 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 25 ते 28 एमएलडी इतकेच पाणी सिडकोला मिळते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या 6 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वायाळ येथील उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे त्याचा परिणाम नागरी वसाहतीतील पाणी पुरवठ्यावर झाला.