रायगड - जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. ऐन थंडीत पावसाचे आगमन झाले असल्याने गारव्यात आणखीनच वाढ झाली आहे. रायगडसह कोकण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अवकाळी पावसाचा आंबा, कांदा उत्पादनावर परिणाम
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडत आहे. पहाटे पाऊस आणि दुपारी ऊन या ऋतुचक्राच्या खेळामुळे कांदा आणि आंबा पिकावर परिणाम होत आहे. अवेळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. सध्या आंब्याच्या झाडाला मोहर आला असून अवकाळी पावसामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाचे पाणी जमिनीत मुरुन कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.