खालापूर (रायगड) - खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील नढाळ पलस धरणाच्या पाण्यात बावीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मोहोपाडा तलावातही एकोणीस वर्षीय युवक बुडाला असून त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.
खालापुरात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू तरुणांच्या बुडून मृत्यू खालापूरात हळहळ व्यक्त
नढाळ पलस धरणावर पिकनिक करण्यासाठी आलेल्या पिंपरी परीसरातील राहणाऱ्या सागर अंबरे (वय 22) याला त्याच्या सोबतच्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाचविणे शक्य झाले नाही. तर मोहोपाडा येथील तलावात पोहण्यास गेलेला राकेशकुमार (वय.19) या युवक तलावामध्य भागातील कारंजा पर्यंत गेला असताना पुन्हा परतत असताना पोहताना दम लागल्याने बुडाला असुन त्याचा मृतदेह 24 तासानंतर पाण्याबाहेर आला आहे. राकेश कुमार याचा मृतदेह अभिजित घरत आणि प्रकाश ठाकूर यांनी तलावाबाहेर काढला. रसायनी पोलिसांच्या व वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या मदतीने तलावाबाहेर काढण्यात आला. यावेळी मोहोपाडा तलावावर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, रसायनी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, गुरुनाथ साठेलकर ग्रुप यांनी भेट दिली होती.
दरम्यान गेल्या तीन दिवसांपुर्वी कुर्ल्यातील तिघांचा पाली भुतिवली धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पलस धरणात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या खोलीचा अंदाज नसणा-या जलाशयात पोहोण्यास उतरण्याचे धाडस पर्यटक आणि विशेषत तरुणांनी करु नये,अ से आवाहन रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले आहे.