रायगड- कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या दोन डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याची माहिती आहे. यामधील एक डॉक्टर कर्जत दहिवली तर दुसरे डॉक्टर कल्याण येथे राहत आहेत. त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह; तालुक्यात 15 कोरोनाबाधित - कर्जत कोरोना केसेस
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून दोन्ही डॉक्टरांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याने खळबळ माजली आहे.
महाड येथील शासकीय रुग्णालयातील परिचरिकेनंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेतील दोन डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कर्जत तालुक्यात सध्या 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आल्याने दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्जत तालुक्यातही मुंबई तसेच इतर शहरातून नागरिक आले असून त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांचे स्वॅब तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी पाठविले होते. त्यांचा रिपोर्ट गुरुवारी सायंकाळी उशिरा आला असून त्यामध्ये हे डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. डॉक्टरांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र,डॉक्टरांनाच कोरोना संसर्ग झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.