रायगड- म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणामध्ये पोहण्याच्या नादात गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर तालुक्यातीलच बनोटी गावामध्ये गुरे चरवण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा मृतदेह दोन दिवसांनंतर धरणामध्ये सापडला आहे.
म्हसळा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू - दोघांचा मृत्यू
गणेश डावरुंग व हरीचंद्र गाणेकर असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
म्हसळा तालुक्यातील आंबेत-संदेरी धरणावर आठ तरुण शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. हे सर्व तरुण मुंबई येथून आपल्या मूळ गावी संदेरी येथे पावसाळी सुट्टीसाठी आले होते. या आठ तरुणांमध्ये एक संदेरी येथील गणेश डावरुंग (वय 25 वर्षे) याने संदेरी धरणातील खोल भागामध्ये उडी मारली. यानंतर काही कालावधीनंतर तो बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात जाऊन शोध घेतला. गणेश याचा शोध घेतल्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढला. यानंतर या तरुणाला जवळील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसरीकडे शनिवारीच तालुक्यातील बनोटी येथील हरीचंद्र गाणेकर (वय 50 वर्षे) हे शेतकरी गुरे चारण्यासाठी जंगलामध्ये गेले होते. तेथे नदीचा ओंढा पार करत असताना अचानक पाण्याचा प्रभाव वाढून त्याचा पाय सरकला व 150 मीटर उंचीच्या धबधब्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि ग्रामस्थांनी शनिवार व रविवारी घेतलेल्या शोधमोहिमेनंतर सोमवारी गाणेकर यांचा मृतदेह खरसई धरणामध्ये सापडला.