रायगड - पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावर चढलेल्या महिलेला वाहतूक पोलिसांनी शिताफीने वाचविल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी माणगाव येथे घडली. विशाल येलवे आणि योगेश मदने असे या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. दरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
माणगाव रेल्वे स्थानकासमोर एका पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उभी असल्याची माहिती विशाल येलवे यांना फोनद्वारे कळली. यानंतर विशाल येलवे यांनी तातडीने आपले सहकारी योगेश मदने यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी नागरिकांची गर्दी इमारतीच्या खाली जमा झालेली होती. यानंतर विशाल येलवे यांनी महिलेस 'तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमची काही अडचण असल्यास मी ती भाऊ म्हणून सोडवतो' असे म्हणत बोलण्यात गुंतवले. दरम्यान, योगेश मदने यांनी इमारतीवर जाऊन महिलेला खेचून खाली आणल्याची माहिती आहे.