रायगड - राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा झाला. होळी दहन केल्यानंतर आज सर्वजन धुलीवंदन खेळून रंगीबेरंगी रंगात रंगून गेले आहेत. रायगडसह कोकणात होळीचा सण आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना त्याला एक वेगळेच महत्व आहे. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील समुद्र किनारे, बाजारपेठा या रंगीबेरंगी चेहऱ्याने फुललेल्या दिसत होत्या. धुलिवंदनच्या निमित्ताने अबाल वृद्धासह, महिला, बच्चे कंपनी रंगात रंगलेले दिसत होते. जिल्ह्यात होळीसह धुलिवंदन सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
रायगडसह कोकणात होळी सणाला महत्व असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. तर होळी सण साजरा करण्यासाठी पर्यटकांनीही जिल्ह्याला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्र किनारी पर्यटकांनी धुळवड सण साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. होळी दहनानंतरचा दुसरा दिवस हा रंगाचा म्हणजे धुळवडीचा दिवस असतो.