रायगड- नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या गाथेवर काढण्यात आलेल्या 'तानाजी द वॉरीयर' या सिनेमाने जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ गाव पुन्हा चर्चेत आले आहे. गोडवली हे नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ आहे. तर उमरठ येथे तान्हाजी मालुसरे यांचे स्मारक असून त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा.
उमरठ येथील तानाजी मालुसरेंचे स्मारक दुर्लक्षित, बघा 'ईटीव्ही भारत' चा हा खास व्हिडिओ पोलादपूर येथून उमरठ गाव हे पंधरा किलोमीटरवर असून रस्ता काही प्रमाणात डांबरी केलेला आहे. तर काही रस्ता हा खडतर आहे. पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुक या गावातून नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे आणि समाधी स्थळाकडे जाण्यास रस्ता आहे. उमरठ या गावात नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा वाडा अथवा घर या ठिकाणी नाही. उमरठ गावात त्यांचे स्मारक बांधले असून कोंढाणा किल्ल्यावर वीरमरण आल्यानंतर त्यांचा देह पालखीतून उमरठ येथे आणण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची समाधीही बांधण्यात आलेली आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या अंत्यविधी वेळी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजही हजर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर निघालेला 'तान्हाजी द अनसंग वॉरीयर' हा सिनेमा आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तान्हाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ असलेल्या उमरठ गावाला पर्यटकांची रेलचेल वाढली असल्याचे उपसरपंच चंद्रकांत कळंबे यांनी सांगितले. तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकाची दुर्दशा झाली असून शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी उपसरपंच चंद्रकांत कळंबे यांनी केली आहे. तसेच पर्यटकांची संख्या वाढली असताना स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय नसल्याने पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील पर्यटन वाढीच्या दृष्टीने शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे, असे कळंबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकात एक आंब्याचे झाड असून साडे तीनशे वर्ष जुने झाड आहे. त्याकाळी यवनांच्या कारवाया होत आल्याने आंब्याच्या झाडाच्या ढोलीत मावळे हे हत्यार लपवून ठेवत असत. काही दिवसांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या. त्यातील दोन तलवारी येथे असून बाकीच्या तलवारी पुणे येथे नेल्या आहेत. तर अजून या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत हत्यारे असल्याची माहिती अर्जुन पार्टे यांनी दिली.
हेही वाचा-रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध