रायगड- 'टिक टॉक' या सोशल साईटवर अलिबागची अस्मिता मलिन करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. याबाबत अलिबागकरांनी एकत्र येत हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन दिले आहे.
'टिक-टॉक'वर अलिबागची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अलिबागकरांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी 'टिक टॉक' या साईटवर पुण्यातील तरुण-तरुणींनी हा अलिबागची बदनामी करणारा व्हिडिओ बनवला आहे. 'अलिबाग से आया है क्या? या वाक्याने अलिबागच्या अस्मितेला ठेच पोहचत आहे. अलिबाग से आया है क्या? या संवादाचा अनेक वेळा सिनेमा, टिव्ही शोमध्ये सर्रास वापर करून अलिबागची बदनामी केली जात आहे. याबाबत अलिबागकरांनी उठाव करून आपला निषेध याआधीही व्यक्त केला आहे. ज्यांनी या वाक्याचा दुरुपयोग केला, अशा अभिनेत्यांनी नंतर माफीही मागितली आहे. मात्र, तरीही अलिबागबाबत प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार सुरूच आहे. याबाबत अलिबागचे राजेंद्र ठाकूर यांनी उच्च न्यायालयात रीट अर्ज दाखल केला आहे.
'टिक टॉक' या सोशल साईटवर वेगवेगळे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. अलिबागबाबतही असाच एक व्हिडिओ पुणे येथील तरुण मुले, मुलींनी बनविला आहे. यामध्ये मग आम्ही काय अलिबागवरून आलो आहोत का? असा उपरोधिकपणे उल्लेख या तरुणांनी केला आहे. त्यामुळे अलिबागच्या अस्मितेला ठेच पोहचली असल्याचा आरोप अलिबागकरांनी केला आहे.
'टिक टॉक'वर केलेल्या या व्हिडिओतील तरुणांवर कायदेशीर कारवाई करावी आणि असे प्रकार थांबले पाहिजे, यासाठी अलिबागमधील तरुणांनी एकत्र येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक, अलिबाग पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन दिले. अलिबागबाबत असे प्रकार वारंवार घडत असून यावर कायम स्वरूपी तोडगा शासनाने काढावा, असे अलिबागकारांनी मत मांडले आहे.
यावेळी राजेंद्र ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकुर, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील, मनसे तालुकाध्यक्ष महेश कुंनुमल, अॅड महेश ठाकूर, अब्दुला मुल्ला तरुण तरुणी उपस्थित होते.