रायगड- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला विजया दशमी दसरा सण आज सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चारचाकी, दुचाकी खरेदी करून घरी आणण्यासाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही नागरिकांची खरेदी मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी व्यवसायिकांनाही चांगलाच आर्थिक फायदा झाला असून आजच्या दिवशी करोडोची उलाढाल बाजारात झाली आहे.
रायगड जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा होत आहे. ग्राहकांचाही खरेदीसाठी उस्फुर्त प्रतिसाद दिसत आहे. चारचाकी, दुचाकी शोरूममध्ये सकाळपासून खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत होती. जिल्ह्यात शेकडो चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी आजच्या दिवशी करण्यात आली असून करोडोंची उलाढाल यानिमित्ताने झाली आहे. कोरोना संकट असतानाही ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल चारचाकी, दुचाकी व्यवसायिकांनी दुजोरा दिला. व्यवसायिकांना चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी दुकानात झालेली आहे.