रायगड -केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि वाढलेल्या डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात आज शिवसेने मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही प्रमाणात वाहतुकीला फटका बसला होता. दक्षिण रायगडात तळा, माणगाव याठिकाणी शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले होते. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाचा निषेधही यावेळी व्यक्त केला.
आश्वासने ठरली फोल
केंद्र सरकारने निवडून येण्यासाठी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र ही सर्व आश्वासने फोल ठरली आहेत. डिझेल, पेट्रोलचे भाव गगनाला पोहोचले आहेत. यावर केंद्र सरकार काहीच हालचाली करीत नाहीत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत शेतकऱ्याच्या विरोधात बोलत असल्याने संतापाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारचा आणि रावसाहेब दानवे याचा निषेध करण्यासाठी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे याच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले.
मुंबई-गोवा महामार्ग ठेवला रोखून
केंद्र सरकारच्या विरोधात रायगडातील शिवसेना आक्रमक झाली आहे. यासाठी शेकडो शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे शिवसैनिकांनी आंदोलन करून महामार्ग रोखला होता. त्यामुळे साधारण दोन ते तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने पोलिसांनी वळवली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
शिवसैनिकांनी माणगाव, तळा याठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. पोलिसांनीही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी तळा तालुकाप्रमुख प्रदूम ढसाळ, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
..अन्यथा तीव्र आंदोलन
केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ केल्याने सर्व सामान्य नागरिकांचे बजेट कोसळले आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून त्यांनीही शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी यानिमित्ताने दिला आहे.