पनवेल- शिरवली ग्रामपंचायतमधील कोंडप आदिवासी पाड्यावरचा ५ वर्षीय गणेश सुरेश पवारचा उजवा पाय चांगला आणि डाव्या गुडघ्यापासून खाली काहीच नाही, अशी अवस्था होती. पण अशा परिस्थितीतही शरीराची वाढ होत होती. अशा अवस्थेत कुबड्यांचा आधार घेत तो चालत होता. शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने तो आता दोन्ही पायांवर चालत आहे.
शिवआधार चॅरिटेबल संस्थेच्या आधाराने गणेश पवारला मिळाला कृत्रिम पाय
गणेशचे आई वडील हे मोलमजुरी करून घराचा खर्च भागवतात. त्यातही सुषमा, सुजाता, संदेश, गणेश आणि आई वडील असा ६ जणांचा परिवार आहे. आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नव्हते. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे कोणाकडे पैसे मागताही येत नाहीत. गणेशला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करतात. पण गणेश खचला नाही. परंतु, गणेशच्या घरच्यांनी पाय बरा करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत.
शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टने दिली मदत
शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके सामाजिक कार्यकर्ता म्हणुन गेली ३ ते ४ वर्षे याठिकाणी विविध उपक्रम राबवतात. एका सामाजिक उपक्रमादरम्यान कोंडप आदिवासी पाड्यावर गणेश पवारसोबत दिव्यांग मुलाची भेट झाली. त्यांनी दिव्यांग असलेल्या गणेशला कृत्रिम जयपुर फुट बसवण्याचे ठरवले आणि त्यासाठी गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना नोव्हेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदा नेरुळ येथील शिवआधार संस्थेच्या अभ्यास केंद्रात आणले.
नवी मुंबई ते महालक्ष्मी (हाजीअली) येथे असलेल्या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर ते मे २०१९ या काळात १८ ते २० वेळा शिवआधार संस्थेमार्फत गणेशला याठिकाणी उपचार करण्यात आले. यशस्वीपणे उपचार पार पडल्यानंतर गणेशला कृत्रिम पाय मिळाला. यामुळे अपंगत्व असलेला गणेश पवार कुठलाही आधार न घेता उभा राहिला. दुसरा पाय मिळाल्याने गणेशला खूप आनंद झाला. आता मी गावापासून दूर असलेल्या शाळेत जाणार असल्याचे सांगत गणेशने शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके, जालिंदर यमगर, अनिकेत वाघोदे, आकाश पाटील, आशुतोष बांदल, अजीत शेळके, अनिकेत देशमाने, निखील हजारे यांचे आभार मानले.
संस्थेमार्फत गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना आदिवासी पाड्यावरून आणणे, राहणे ,खाणे, प्रवास खर्च हा सर्व खर्च करण्यात आला. आखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. शिवआधार संस्थेने केलेले प्रयत्न पाहून गणेशचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.