रायगड- जिल्ह्यात पावसाने सोमवारी सकाळपासून जोरदार सुरुवात केल्याने सावित्री आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. महाड येथे सावित्री तर रोहा येथे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण विभागाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
खोपोली, रोहा, नागोठणे, अलिबाग, महाड, पोलादपूर या तालुक्यात सकाळ पासून पावसाने मुसळधार सुरुवात केली होती. त्यामुळे महाड येथे सावित्री तर रोहा येथे कुंडलिका या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. सावित्री नदीची इशारा पातळी 6 मीटर असून पाणी पातळी 7 मीटर झाली, त्यामुळे सावित्री पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. महाड शहरातील बाजारपेठ, घरे आणि दुकानात पाणी घुसल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.