रायगड- मुंबई-पुणे महामार्गावर रोज कुठे ना कुठे अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडतात, तर काही जण गंभीर जखमी होतात. अशा वेळी अपघातस्थळी थांबण्याची व त्यांना मदत करण्याची तसदी शक्यतो कोणी घेत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मदत मिळण्यास उशीर झाल्याने जखमी प्रवाशांचे मृत्यू होतात. परंतु, या महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदतीसाठी साठीलकर भगिनी तत्पर आहेत. या भगीनींनी अपघातग्रस्तांच्या मदतीचे व्रत हाती घेतले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांच्या कार्याचा घेतला हा धांडोळा.
जिल्ह्यातील खोपोली शहरात राहणाऱ्या पूजा व भक्ती ह्या श्रद्धा साठीलकर व गुरुनाथ साठीलकर यांच्या कन्या आहेत. या दोघीही बहिनी अभियांत्रिकी पदवीधारक आहेत. पूजा ही इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय करते तर भक्ती इंजिनीयर होऊन एमबीएचे शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित असूनही या दोघीनी वडिलांचा आदर्श घेऊन अपघातग्रस्तांना मदतीचा वसा उचललेला आहे. त्यांचे वडील गुरुनाथ साठीलकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली २० ते २५ वर्ष मुंबई-पुणे महामार्ग तसेच खालापुरमध्ये अपघातग्रस्तांना मदत करीत आहेत.