रायगड - भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रोरो बोट सेवेची चाचणी घेण्यात आली आहे. ही रोरो बोट आज मांडवा जेट्टीला लागली. 'प्रोटो प्रोसेस' ही अत्याधुनिक रोरो बोट मांडवा बंदराला लागल्यानंतर नागरिकांनी बोट पाहण्यासाठी गर्दी केली होती.
मुंबईतील भाऊचा धक्का येथून रोरो बोट 1 वाजून 22 मिनिटांनी मांडवा अलिबागकडे येण्यास निघाली. ही बोट 50 मिनिटांत मांडवा बंदराच्या जेट्टीला लागली. रोरो बोटीची चाचणी घेण्यात येत असून एमएमबी, एमबीटी, बोट नोंदणी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली रोरो बोटीची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. रोरो बोटीतून वाहनेही आणण्यात आली असून त्यांची चढताना व उतरताना चाचणी घेण्यात आली. रोरो बोटीची चाचणी यशस्वीरीत्या झाल्यानंतर ही बोटसेवा 15 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्याचा मानस आहे.