रायगड- जिल्ह्यात समुद्राचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अशावेळी समुद्राच्या पाण्यात आणि समुद्र किनारी मौजमजा करताना फोटो काढण्याचा मोह अनेकांना होत असतो. पर्यटकांची हीच अपेक्षा ओळखून झारखंड येथून आलेल्या उमेश राम याने १५ वर्षांपूर्वी अलिबाग समुद्र किनारी फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला.
परराज्यातील उमेश रायगडमध्ये करतोय फोटोग्राफीचा व्यवसाय परराज्यातून येऊन कोणीही ओळखीचे नसताना, वेगळी भाषा आणि वेगळा परिसर अशी परिस्थिती असताना उमेश सर्व परिस्थितींवर मात करून आज फोटोग्राफी व्यवसायात स्थिरावला आहे. म्हणजे परराज्यातून येऊन उमेश सारखा तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. मात्र, स्थानिक बेरोजगार तरुण नोकरी लागत नाही म्हणून दोष देत बसलेला आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला आहे. विस्तीर्ण समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, किल्ले यासारखी पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात असून येथील स्थानिकांचाही आर्थिक स्तर उंचावलेला आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तरीही बेरोजगारीचा प्रश्न जिल्ह्यात कायम आहे.
जिल्ह्यात अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर याठिकाणी विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. याठिकाणी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे समुद्र किनारी वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असतात. मात्र स्थानिक बेरोजगार तरुण हा या संधीचा फायदा घेत नाही आणि परराज्यातून आलेले तरुण समुद्र किनारी व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
उमेशने असा सुरू केला व्यवसाय -
उमेश राम हा झारखंड राज्यातून आलेला तरुण अलिबाग समुद्र किनारी फोटोग्राफी व्यवसाय करीत आहे. अलिबाग येथे समुद्र किनारा असून त्याठिकाणी पर्यटकांचे फोटो काढण्याचा व्यवसाय करू शकतोस, असे त्याच्या मावस भावाने सांगितल्यानंतर तो २००५ ला अलिबाग येथे आला. आता उमेश दिवसाला ६०० ते ७०० रुपये कमावतो. अलिबागमध्ये उमेश भाड्याने राहत असून या व्यवसायावर आज स्वतःचे लग्न त्याने केले आहे. त्याला एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. जिद्द, चिकाटी तसेच अलिबागकरांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे आज उमेश राम हा अलिबागकर झाला आहे. अलिबागच्या समुद्र किनारी पर्यटकांचे फोटो काढणारा उमेश हा पहिला फोटोग्राफर आहे.