रायगड - जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली असून पहाटेपासून रायगडला पावसाने झोडपून काढले आहे. आठवड्यापासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार; भात लागवडीला वेग
रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली असून पहाटेपासून रायगडला पावसाने झोडपून काढले आहे.
जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनीही भात लावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाच्या दोन-चार सरी पडत होत्या. तर दक्षिण भागात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. तर रायगडकरांना सुर्यदर्शनही झाले होते. आज पहाटेपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली आहे. पावसासह वादळी वारेही वाहत आहेत. हवामान खात्याने २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार जिल्ह्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात आज ५९८.८० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ३७.४३ मिमी पाऊस पडला आहे. तर अलिबाग ३ मिमी, पेण ७०.२० मिमी, मुरुड ३६ मिमी, पनवेल ३७.८० मिमी, उरण १६ मिमी, कर्जत ३४.८० मिमी, खालापूर २० मिमी, माणगाव ३० मिमी, रोहा ४४ मिमी, सुधागड ३८ मिमी, तळा ६७ मिमी, महाड २९ मिमी, पोलादपूर ३४ मिमी, म्हसळा ४६ मिमी, श्रीवर्धन ४० मिमी, माथेरान ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.