रायगड -कोरोनाच्या भीतीमुळे रायगडच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शनिवारपासून लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना हे सर्व बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्र किनाऱ्यावरील व्यवसायिकांना बसला आहे. परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
हेही वाचा -ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी होणार स्वच्छ, जैव स्वच्छता पध्दतीचा वापर
दरवर्षी होळीच्या निमित्ताने बहरणारे समुद्रकिनारे यंदा सुनेसुने दिसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, वरसोली, काशिद, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे धुलिवंदन आणि होळी सणाच्या निमित्त गर्दीने फुलून जातात. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये तर जागाही मिळत नाही. मुंबई, पुणे, ठाणे या भागातून अनेक कुटुंबे चार दिवस येणाऱ्या सुट्टीची संधी साधून आपल्या कच्च्याबच्च्यांसह पर्यटनासाठी जाणार होते. मात्र, या वेळेला कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनीबनवलेले प्लॅन रद्द केले आहेत. या पाश्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.