महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड रोप-वे : जिल्हाधिकाऱ्यांची कंपनीला नोटीस, किल्ल्यावरील विनापरवाना कामाबद्दल मागितला खुलासा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंपनी संचालकांना विनापरवाना काम सुरू केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. परवानगीची कागदपत्रे कंपनीने 48 तासात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी, अन्यथा कारवाईस तयार राहण्याचा इशारा यामार्फत देण्यात आला आहे.

raigad rope-way company issue
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंपनी संचालकांना विनापरवाना काम सुरू केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

By

Published : Dec 28, 2019, 6:07 PM IST

रायगड - पुरातत्त्व विभाग, जिल्हा प्रशासन, रायगड प्राधिकरण यांपैकी कोणाचीही परवानगी न घेता रायगड किल्ल्यावर रोपवे कंपनीने अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंपनी संचालकांना नोटीस बजावली आहे. परवानगीची कागदपत्रे कंपनीने 48 तासात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावी, अन्यथा कारवाईस तयार राहण्याचा इशारा नोटीशीमार्फत देण्यात आला आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत रोपवे कंपनीच्या कारभारावर टीका केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने कंपनीला नोटीस बजावली आहे.

रोपवे कंपनीची मनमानी?

रायगडावर पर्यटकांसाठी रोपवे करण्यात आला. मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेड कंपनीला संबंधित कंत्राट दिले. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याने रोपवेच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज भासली. यासाठी जिल्हा प्रशासनास तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासन, रायगड प्राधिकरण यांनी या कामाला कोणालाही अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र, रोपवे कंपनीने कोणाचीही परवानगी न घेता परस्पर गडाच्या पायथ्याशी बांधकाम सुरू केले आहे. तसेच या कंपनीने जिल्हा प्रशासन आणि रायगड प्राधिकरणाला डावलून परस्पर प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पाठवला होता.

हेही वाचा -महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग अडकला टक्केवारीत

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी नुकतीच रायगड किल्ल्याची पाहणी करून प्राधिकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी गडाच्या पायथ्याशी रोपवेचा विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी रोपवेच्या कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनामार्फत रोपवेच्या कामाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संबंधित बेकायदेशीर कामावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी ही नोटीस बजावल्याचे समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details