रायगड- विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात असताना पक्ष प्रवेश सध्या जोरात सुरू आहे. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटा येथील अनेक पक्षांतील दिग्गजांनी लावला आहे. राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधून परिवारासह शिवसेना पक्षप्रवेश केला.
महाड राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रघुवीर देशमुख शिवसेनेत; सुनील तटकरेंना धक्का - raghuveer deshmukh
राष्ट्रवादीला महाडमध्ये आधीच गळती लागली असताना रघुवीर देशमुख यांच्या शिवसेनेत जाण्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे.
रघुवीर देशमुख यांनी आमदार भरत गोगावले यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत भविष्यात समाजोपयोगी कामे करायची असतील तर शिवसेना भाजपाशिवाय पर्याय नाही, असे सूतोवाच करीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे विशेष पदाधिकारी उपस्थित होते.
रघुवीर देशमुख हे खासदार सुनिल तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांच्यावरचा आदर तसाच ठेवत त्यांनी पक्षप्रवेश केल्याने काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया वर झाल्या आहेत. तसेच तटकरे काय करतील याचा काही नेम नाही, अशी चर्चा सध्या महाडमध्ये सुरू आहे. त्यामुळे असे डावपेच झाल्यास काँग्रेसच्या माणिक जगताप यांना ही निवडणूक जड जाईल काय, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.