रायगड -लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे अनंत गीते याची विजयाची हॅट्रिक हुकली आहे. या विजयाबरोबरच तटकरे यांनी २०१४ च्या पराभवाचे उट्टे भरून काढले आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र, खरी लढत तटकरे विरुद्ध गीते अशीच झाली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला होता. गीते यांनी तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर तटकरेंनी निष्क्रिय खासदार म्हणून गीतेंवर टीका केली होती. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हेच प्रचाराचे खरे मुद्दे ठरले होते. मात्र, निकालानंतर तटकरे यांच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आणि त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवले.
रायगड लोकसभेचा निकाल हा पुढे होणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे निकालानंतर सहाही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती बदललेली दिसत आहे. या निकालामुळे प्रस्थापितांना मात्र आधीच धोक्याचा इशारा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, अशी महाआघाडी यावेळी रायगडात झाली होती. शेकाप पहिल्यांदाच या महा आघाडीत सामील झाला होता. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठे तरी नाराजी होती. ही नाराजी अलिबाग मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्यामुळेच सुनील तटकरे याना अपेक्षित असलेली मते शेकाप आणि काँग्रेस पक्ष देण्यात कुठे तरी कमी पडले. अलिबाग विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप काँग्रेस यांची मिळून साधारण सव्वा लाख मते होती. मात्र प्रत्यक्षात तटकरे यांना ९६ हजार ६३९ मते पडली. तर शिवसेना भाजपकडे ६५ हजार मते होती. यात वाढ झाली असून ७९ हजार ४७९ मते पडली. त्यामुळे गीते यांना वाढलेली मते ही आघाडीचीच मते पडली असल्याचे चित्र आहे. येथून तटकरे याना १७ हजार १४२ चे मताधिक्य मिळालेले आहे.
पेण मतदार संघात अनंत गीते याना ९० हजार ५८८ तर सुनील तटकरे याना ८९ हजार २८१ एवढी मते पडली. त्यामुळे गीतेंना याठिकाणी १ हजार ३०७ चे मताधिक्य मिळाले आहे. श्रीवर्धनमध्ये तटकरे यांनी शिवसेनेला गाफील ठेवून छुपी मोर्चे बांधणी केल्याने तटकरे यांना ८५ हजार ८८० तर गींतेना ५१ हजार ००९ मते पडली. त्यामुळे तटकरे यांना ३४ हजार ८७१ मताची भरघोस आघाडी मिळाली.