मुंबई - रिलायन्स गॅस कंपनीने अल्प दरात जमिनी संपादित केल्याचा आरोप रायगड जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवरपेन, खालापूर येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
रायगडमधील पेन, खालापूर येथील 240 शेतकरी या रिलायन्स गॅस लाईन कंपनीच्या पाईपलाईन प्रकल्पात बाधित झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना कमी जमीनभाव दिलेला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन हे शेतकरी आपल्या प्रकल्पग्रस्त संघटनेच्या मार्फत व शेतकरी विष्णू पाटील यांचा नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलनासाठी आले आहेत. शासनाने व रिलायन्स कंपनीने जर बाधीत शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली नाही तर पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करणार. तसेच सीएसटी ते मंत्रालय असे अर्धनग्न आंदोलन करणार आहोत, असे विष्णू पाटील यांनी सांगितले आहे.