रायगड -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 'लॉक डाऊन' लागू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वच नागरिकांना स्वतःला 'होम क्वारन्टाईन' करण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुंबई-पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनीही स्वतःला होम क्वारन्टाईन करून घ्यावे. घरातील व्यक्तींनीही त्याच्यापासून अंतर ठेवून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
कोरोना विषाणूची लागण देशात झाली असून महाराष्ट्रातही बाधित सापडले आहेत. तसेच राज्यात आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाबंदीही लागू आहे. जिल्ह्यातही एक पॉझिटिव्ह कोरोना बाधित असून त्याचे आरोग्य सुधारत आहे. दरम्यान, आजारी, वृद्ध व्यक्तींपासून दूर राहण्याचे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.