पनवेल- निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिसांनी शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीला तळोजामधून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अरुण विठ्ठल बेनकनहळी, असे आरोपीचे नाव आहे.
तळोजामधून शस्त्रे बाळगणाऱ्याला अटक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई - मावळ लोकसभा मतदारसंघ
आरोपीकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. या मतदारसंघात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस दक्षतेने कार्यवाही करत आहेत.
तळोजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर निकम, पोलीस उपनिरीक्षक बिरप्पा लातुरे आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार तळोजा फेज-१ येथील सेक्टर २६ मधील शिर्के कन्स्ट्रक्शनजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी अरुण विठ्ठल बेनकनहळी (२५) या आरोपीकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. त्यांनतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील शस्त्र तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. आरोपी हा मुळचा कर्नाटकातील असून तो तळोजा फेज-२ मध्ये राहत आहे.
न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींनी ही हत्यारे कुठून आणि कशासाठी आणली याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.