रायगड - मुंबईसह राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी हे आपल्या गावी चालत, वाहनाने येऊ लागले आहेत. रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबई, राज्य, परराज्य आणि परदेशातून 1 लाख 3 हजार 26 नागरिक दाखल झाले आहेत. यात अलिबाग, महाड, माणगाव, म्हसळा या तालुक्यात १० हजारांच्यावर नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडकरांच्या डोक्याचा ताप वाढू लागला आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली असतानाही एवढे नागरिक आले कसे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
जिल्ह्यात मुंबई, राज्यातून परराज्यातून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे दोन जणांना कोरोना बाधा झाली असल्याने रायगडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात लाखभर नागरिक दाखल झाल्यामुळे जिल्हा प्रशासनावरही त्याचा ताण पडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशात वाढू लागल्यानंतर 22 मार्चपासून पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागू केला. संचारबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्याच्या अंतर्गत सीमा या बंद करण्यात आल्या. त्यामुळे बाहेरील आणि जिल्ह्यातील व्यक्तींना बंदी घालण्यात आली. जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरातच बसा असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.
मुंबईमध्ये तसेच इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जिल्ह्यातील चाकरमान्यांना आपले गाव बरेसे वाटू लागले. मात्र, वाहतूकसेवा बंद असल्याने अनेकजण हे रस्त्याने, रेल्वे रुळाने पायी चालत येऊ लागले. तर, काहीजण आपली वाहने घेऊन येऊ लागले. त्यामुळे संचारबंदी काळात रस्त्याने पायी चालत येणाऱ्याची संख्या वाढू लागली आणि ही संख्या आता लाखावर पोहचली आहे. मात्र, येणाऱ्या या नागरिकांमुळे रायगडकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.