रायगड- शुक्रवारपासून श्रावण महिन्यास सुरुवात होत असल्याने साऱ्यांनाच गटारी अमावस्येचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात गटारी बुधवारी साजरी होणार आहे. काही नागरिकांनी रविवारपासूनच गटारी साजरी करायला सुरुवात केली आहे. गटारीनिमित्त रायगडातील खवय्ये आता मटणावर ताव मारण्याच्या तयारीत आहेत.
गटारी निमित्त खवय्यांची मटण दुकानावरील गर्दी बुधवारी पहाटे पासूनच मटण, चिकन दुकानांवर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अलिबाग बकरे, मटण खाटीक संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घरत यांनी पावसामुळे मटणाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, मटणाचे भाव वाढले नसल्याने खवय्यांची चिंता मिटली. त्यामुळे गटारीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मटण, चिकनचा आस्वाद घेतला जाणार आहे. श्रावण सुरू झाला की अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी श्रावण पाळणारे आणि मद्यपी गटारी अमावस्येची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी 2 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे.
बुधवार हा मांसाहारासाठी अनेकांचा पसंतीचा असल्याने या दिवशी गटारी अमावस्या असल्यामुळे नागरिकांसाठी सोनेपे सुहागा असल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे गटारी साजरी करण्याचे पार्टीचे बेत तयार झाले आहेत. बुधवारी पहाटेपासून मटण, चिकन दुकानांवर रांगा लागल्या आहेत. गटारीच्या निमित्ताने मटण विक्रेत्यांनी कल्याण, चाकण येथून बोकड आणले आहेत. अलिबाग तालुक्यात साधारण साडेतीन हजार बोकड आणले आहेत. जिल्ह्यात गटारी निमित्त 50 ते 60 हजार बोकडांचे मटण बुधवारी फस्त केले जाईल, असे चित्र आहे. गटारी निमित्त अनेकांनी पार्टीची तयारी केली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात मोठ्या प्रमाणात बोकड मृत्युमुखी पडले. बाजारात विक्रीसाठी बकऱ्या कमी आल्या त्यामुळे खरेदी सहाशे रुपये किलोने झाली. पावसाची झळ मटण विक्रेत्यांना पोहचली होती. त्यामुळे गटारी अमावस्येच्या निमित्ताने मटणाचे भाव किलोला 50 ते 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. मात्र, मटणाचे भाव वाढले नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.