पेण (रायगड) -यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर विद्युत मंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही कामे युद्धपातळीवर करत असतानाच तोंडावर आलेल्या पावसाचा सामना करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा पुरविण्यासाठी पेण विद्युत मंडळ सज्ज झाले आहे. पावसाळ्यात कोणत्याही ठिकाणी पोल उन्मळून पडणे किंवा विद्युत तार पडणे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी स्पर्श न करता त्वरित विद्युत मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन, विद्युत मंडळाचे उपकार्यकरी अभियंता उमाकांत सकपाळे यांनी ग्राहकांना केले आहे.
'विद्युत मंडळाने कामे पावसाळ्यापूर्वी करून घेतली आहेत'
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या झाडांची छाटणी, तसेच वाकलेले 70 ते 75 पोल पुन्हा उभे करणे, कंडक्टर ओढणे आदी कामे पेण विद्युत मंडळाने पावसाळ्यापूर्वी करून घेतली आहेत. त्याशिवाय गेली अनेक वर्षे पेणच्या मुख्य बाजारपेठेत असणारे सडलेले पोल देखील विद्युत मंडळाने बदलले असल्याची माहिती उमाकांत सकपाळे यांनी दिली. त्याचप्रमाणे जरी पावसापूर्वी सर्व तयारी केली असली तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आणि एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी आमचा पूर्ण स्टाफ आणि संबंधित ठेकेदारांना सज्ज राहण्याचे आदेश देखील दिले असल्याचे सकपाळे यांनी सांगितले.