पनवेल- मावळ मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेल दौऱ्यावर आहेत. नुकताच ते रस्त्यावरून धावत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार सभा ठिकाणी धावत पळत जात असल्याचे सांगून हा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, सभा नसतानाही पार्थ पवारांची दिसत असलेली ही पळापळ केवळ एक स्टंट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्या भाषणाच्या वेळी अडखळत केलेल्या भाषणावरून ट्रोल झालेले पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोलच्या जाळ्यात अडकले आहेत.
मावळ मतदारसंघात मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार सध्या पनवेलमधल्या गल्लीत फिरताना दिसून येत आहेत. रविवारी रात्री ते पनवेलमधील मोहल्ला परिसरात प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मोहल्ला परिसरातील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार होते. सभेसाठी उशीर झाला म्हणून थेट रस्त्यावरून धावत पळत सभेच्या ठिकाणी जतानाचा पार्थ पवारांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु ज्या परिसरात पार्थ पवार सभेसाठी जाणार होते, तेथे कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.