पनवेल - पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, रस्ते, अग्निशमन सेवा, शहर सफाई, आरोग्य शिक्षण, क्रीडा, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, वंचितांचा विकास आणि पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास या सर्व नागरी कामांना गती देत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शनिवारी पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समितीत मांडला. मागील आर्थिक वर्षाची शिल्लक गृहीत धरून १०३५.९५ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातून १०३५.०२इतका खर्चाचा अंदाज लावून तब्बल ९३लाखांचा शिलकीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
पनवेल महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन त्यासाठी ३३६कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केला. आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा सन २०१८ते १९सुधारित आणि सन २०१९ते २०मुळात संकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५च्या अन्वये केल्याचे सांगून तो स्थायी समितीसमोर सादर करण्यात येत असल्याचे सांगितले. सन २०१८ते १९सुधारित अर्थसंकल्पात चालू वित्तीय वर्षातील प्रथम आठ महिन्यांतील प्रत्यक्ष जमा उत्पन्न आणि खर्च तसेच पुढील चार महिन्यात होणारा अपेक्षित जमा आणि खर्च विचारात घेण्यात आला असल्याचे देखील आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.