महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पांडवकडा धबधब्यावर यंदाही पर्यटकांना नो एन्ट्री? - पांडवकडा धबधबा

खारघरमधील पांडवकडा या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना यंदाही बंदी घातली जाणार असल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

पनवेल

By

Published : Jun 9, 2019, 8:42 PM IST

पनवेल - काही दिवसातच पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरुणाईकडून वेगवेगळ्या धबधब्यावर सहलीचे नियोजन करण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, अशातच खारघरमधील पांडवकडा या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना यंदाही बंदी घातली जाणार असल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

नवी मुंबईसह मुंबई आणि आसपासच्या नागरिकांना पावसाळ्यातील पर्यटनाचे जवळचे ठिकाण म्हणून पांडवकडा धबधब्याकडे पाहिले जाते. हा धबधबा आबाल-वृध्दांचे आकर्षण असल्याने तो पावसाळ्यात पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक पर्यटकांनी केली आहे. तर आतापर्यंत प्रत्येक पावसाळ्यात पांडवकड्यावर पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही आणि मद्यधुंद पर्यटकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून अशा घटना घडू नयेत यासाठी सालाबादप्रमाणे पांडवकड्यावर पर्यटकांना ‘नो एन्ट्री’ ठेवावी असे वनविभागाचे म्हणणं आहे.

पांडवकडा धबधबा

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने योग्य त्या उपाययोजना केल्यास हा धबधबा एक सुंदर पर्यटनस्थळ होऊ शकते. यासाठी वनविभागाने पांडवकडा धबधब्याच्या परिसरात विविध कामेदेखील केली आहेत. त्यामध्ये नेचर पार्कअंतर्गत प्रस्तावित कामांपैकी जल व मृदा संधारण, दगडी नाला बांधणीच्या कामांचा समावेश असून प्रस्तावित क्षेत्रांपैकी ५५० हेक्टर क्षेत्रावर २४,५९८ घ.मी. नाला बांधण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिमेंटची भिंत उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २९ लाख रुपयांचा निधी मागील वर्षी देण्यात आला होता. मात्र, तरीही या धबधब्यावर अपघातांची मालिका संपत नाही, असे चित्र आहे.

म्हणूनच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यटकांना जवळून पांडवकडा धबधबा पहायला मिळणार नाही. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आजवर शेकडो पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या या धबधब्यावर वन विभागाने बंदी घालणे योग्य असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details