रायगड-शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच त्याचे दुःख कळते, घरात बसून कळत नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत संवेदनशील नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. रायगडातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न करता दोन-चार दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्यात पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धावता दौरा केला. यावेळी माणगाव, पेण या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याच्या समस्याही जाणून घेतल्या. प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले.प्रवीण दरेकर यांनी आज रायगडातील नुकसान झालेल्या भातशेतीचे पाहणी करण्यासाठी तातडीने दौरा केला. रायगड हा माझा जिल्हा असून येथील शेतकऱ्यांचे दुःख हे माझे दुःख आहे. पावसामुळे बहरलेली शेती ही पूर्णपणे झोपली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे, आढावा, आश्वासने न देता दोन-चार दिवसात शेतकऱ्याच्या हातात पैसे द्यावे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णपणे गेले असल्याने पुन्हा पीक काढण्यासाठी लागणारा खर्च शासनाकडून मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही दरेकर म्हणाले.राज्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. हे सरकार असंवेदनशील आहे. घरात बसून शेतकऱ्यांची दुःख कळत नाहीत. असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.