रायगड - जिल्ह्याच्या अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरात आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती हा कोरोनामुक्त झाला. रविवारी जिल्हा रुग्णालयाकडून त्याचे स्वागत करण्यात आले आणि पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या ही 2 हजार पार झाली असली तरी आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 हजार 582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 738 जणांवर उपचार सुरू असून 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रायगड : आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 1,582 जणांनी केली कोरोनावर मात - corona patients in raigad
अलिबाग शहरातील एका कोरोना रुग्णाला उपचाराअंती रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्याच्यावर पुष्पवृष्टी करून रुग्णालयातून निरोप देण्यात आला. तर, आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 738 जणांवर उपचार सुरू असून 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील व्यक्तीला आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्यावर अलिबाग येथील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले होते. आजरोजी या व्यक्तीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद गवई, डॉ. विक्रमजीत पाडोळे, मेट्रेन जे एस मोरे, एनएम फीर्के, प्रशासकीय अधिकारी डॉ. धामोडे, परिचारिका यांनी टाळ्या वाजवून, पुष्पवृष्टी करून त्याला निरोप दिला.
अलिबाग तालुक्यातही गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत 86 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 40 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 40 जणांवर उपचार सुरू असून तेही लवकरच बरे होऊन घरी जातील असे डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले. तर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाणही 60 टक्के असल्याचे डॉ गवई यांनी सांगितले.